नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):
माणूस दिसतो तसा कधीच नसतो ही म्हण अनादी काळापासून चालत असली, तरी आभासी जग झालेल्या सोशल मीडियावर व्यक्त होणारा, तर तुलना न केलेली बरी, असे नग पदोपदी आढळून येतात…खरे तर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे…परंतु,पोलीस खात्याला देखील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे डाग लागत आहे…आता असेच तीन पोलीस स्वप्नील देवरे,विशाल दखने,सचिन बोरकर यांना रंगेहाथ पकडले आहे…
तुझ्या गाडीचे पासिंग आणि पियूसी संपली असून तुझे लायसन देखील एन टी आहे. तुला २० ते २५ हजाराचा दंड भरावा लागेल, अशी दमदाटी करून एका टेम्पो चालकाकडून तीन हजार रुपये घेतल्याप्रकरणी नवी मुबईतील तीन पोलिसांविरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला… विक्रम वसंत खोत (वय ३४, रा. द्रोणागिरी) असे तक्रारदार टेम्पो चालकाचे नाव आहे. बेलापूर येथे विक्रम खोत हे एका गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅस पोहच करण्याचे काम करतात. शनिवारी (दि.५) ते आणि त्याचा हेल्पर नितीन शेळके यांनी सकाळी ८.३० वाजल्यापासून परिसरात टेम्पोतून गॅस सिलिंडर पोहचवण्याचे काम केले. त्यानंतर खोत हे आपला टेंपो (क्र. एम एच ०५ बी एच ६०५८) बेलापूर येथून उरण फाटाकडे निघाले. दुपारी दोन वाजता ते उरण फाट्यावरून उरण रोडकडे जात असताना त्यांना या मार्गावर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील एका व्यक्तीने हात करून थांबवले. त्यानंतर त्या गाडीतील एका पोलिसांने खाली उतरून गाडी कशी चालवतो, तुझ्याकडे गाडीचे पेपर आहेत का ? असे म्हणत दमदाटी करून पेपरची मागणी केली. याचवेळी गाडीतीला आणखी एका पोलिसाने मोबाईलमध्ये पाहत तुझ्या गाडीची पासींग आणि पियूसी संपली आहे. तुझे लायसन देखील एन टी आहे, असे म्हणत दोघांनी दंडाची रक्कम मागण्यास सुरवात केली. उद्या कोर्ट बंद आहे, तुझ्याकडे पैसे किती आहेत असे म्हणून खोत व त्यांच्या हेल्परजवळील दीड हजार घेतले. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या एका रिक्षा चालकाला थांबवून त्याच्या अकाऊंटला ऑनलाइन दीड हजार रुपये पाठवायला सांगितले. असे एकूण तीन हजार रुपये पोलिसांनी घेतल्याचा आरोप टेम्पो चालक विक्रम खोत यांनी केला आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात तीन पोलिसाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.