मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-
दररोजच्या धावपळीच्या जीवनात सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आज ‘हर दिल मुंबई’चा नारा देत मुंबईकरांची पहाट झाली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ ही स्पर्धा रविवार, १९ जानेवारी रोजी पार पडली असून युवा पिढीचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाली.हजारो मुंबईकर नागरिकांसह जगभरातील धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, मुख्य मॅरेथॉन ४२.१९५ कि.मी., अर्ध मॅरेथॉन २१.०९७ कि.मी., ओपन मॅरेथॉन १० कि.मी., चॅम्पियन्स विथ डिसएबिलिटी १.३ कि.मी., ज्येष्ठ नागरिक रन ४.२ कि.मी. आणि ड्रीम रन ५.९ कि.मी. या गटात मुंबई मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरातून पहाटे ५ वाजता मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. तर अर्ध मॅरेथॉन या प्रकारातील स्पर्धा माहिम कॉजवे येथील माहिम रेती बंदर ग्राउंड येथून सुरू झाली. अनेकांनी व्यायाम (वॉर्म अप) करून धावायला सुरूवात केली. एरवी घडयाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या उत्साहालाही उधाण आले. या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी फौजही तैनात आहे. विविध गटांचा मॅरेथॉन स्थळाकडे जाणारा मार्ग दाखविण्यासाठी ‘सीएसएमटी’ रेल्वे स्थानकावर स्वयंसेवक उभे आहेत. एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धकांना मॅरेथॉनस्थळी सोडण्यात आले. तसेच मॅरेथॉन मार्गावर विविध दिशादर्शक तसेच माहितीपर फलक आणि एलइडी स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या…मॅरेथॉन मार्गावर अनेकांना छायाचित्रे व सेल्फी टिपण्याचा आणि चित्रफिती काढण्याचा मोह आवरत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मॅरेथॉनबाबत उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळत असून ‘हर दिल मुंबई’चा नारा देत धावपटू मुंबईच्या रस्त्यांवर धावत होते…