अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग शहरात भुरट्या चोरांनी डोके वर काढले असून हे चोरटे पैसे सोबत असलेल्या नागरिकांना हेरून चोरी करत आहेत. अलिबाग पोलीसांच्या ढिलाईमुळे शहर दिवसेन दिवस असुरक्षित बनत असल्याची तक्रार आता सामान्य नागरिकांसह अलिबागला येणारे पर्यटक करत आहेत.अलिबाग शहरातील रामनाथ येथील गावदेवी मंदिरासमोर असलेल्या डेरीजवळ दुचाकी उभी होती. दुचाकी मालक खरेदीसाठी इतरस्त्र गेला होता. त्याचवेळी संधी साधून हा भुरटा चोर तिथे पोचला. चोरट्याने आधी घटनास्थळी पाहणी केली. दुचाकीच्या आसपास फेऱ्या मारल्या. नंतर आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही पाहून त्याने दुचाकीच्या डिक्कीतून पैशांची पिशवी अलगद लंपास केली. ही दुचाकी वरसोली – कोळीवाडा येथील ब्रिजेश तांबोळी यांची असल्याचे समोर आले आहे. या गाडीतील २५ हजार रुपये घेऊन चोरटा आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. भरदिवसा दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या cctv मध्ये चोरटा रेकी करताना, चोरी करताना, घटनेनंतर आपल्या साथीदाराच्या दुचाकीवरून पसार होताना कैद झाला आहे…