बेणसेतील शेत तलावात बुडालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू … आत्तार कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि … 

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-

रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थ नगर  येथील गावाखाली असणाऱ्या एका शेत तलावात (सालडोली) पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाल्याची घटना शुक्रवार दि.(20) रोजी सायंकाळी उशिरा घडली होती… या  तीन तरुणांना उपचारासाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फॅमिली वेल्फेअर सेंटरमध्ये आणण्यात आले होते, त्यानंतर पुढील उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल वडखळ याठिकाणी नेले होते. मात्र बुडालेल्या तरुणांनी शेवटपर्यंत उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने तेथील डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याचे रात्री उशिरा घोषित केले. त्यानंतर या कुटुंबावर व संपूर्ण बेणसे ,बेणसे मोहल्ला,  झोतिरपाडा, सिध्दार्थ नगरावर अक्षरश शोककळा पसरलीय. मयत तरुणांमध्ये एकाच कुटुंबातील जोहेब जाकीर अत्तर( वय 17), मिझान जाकीर अत्तार ( वय14), तर अश्फाक अली (वय 16 ) यांचा समावेश आहे. अत्तार कुटुंबातील दोन सख्ये भाऊ या दुर्घटनेत मयत झाल्याने अत्तार कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अली कुटुंबातील एकुलता एक तरुण या घटनेत मयत झाल्याने अली कुटुंब देखील दुःखाच्या खाईत लोटले गेलेय. बेणसे विभागात इतकी मोठी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली  असल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त होतेय. या घटनेनंतर बेणसे मोहल्ला येथे नातेवाईक, कुटुंब व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.या विशाल दुःखातून सावरण्याचे या कुटुंबाला बळ मिळावे अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जातेय.