मुंबई शिवसत्ता टाइम्स (पूनम पाटगावे):-
मुंबईच्या पारंपरिक खेळांना नवा आयाम देणाऱ्या प्रो गोविंदा लीगमध्ये यंदा जोगेश्वरीच्या आर्यन्स गोविंदा पथकाने विजेतेपद पटकावून अभिमानाचा झेंडा फडकावला.अंतिम फेरीत दमदार खेळी करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आणि चॅम्पियनपदावर आपली मोहोर उमटवली.लीगदरम्यान आर्यन्सच्या खेळाडूंनी दाखवलेली चपळाई, ताकद आणि नेमकेपणा याची चर्चा सर्वत्र रंगली.सातत्यपूर्ण सराव,परस्परांवरील विश्वास आणि एकमेकांना दिलेला खंबीर पाठिंबा हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली.
स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांच्या गगनभेदी घोषणांनी मैदान दणाणून गेले.प्रत्येक थरारक क्षणाला साथ देणाऱ्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल पथकाने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.या विजयानंतर जोगेश्वरीत जल्लोषाची लाट उसळली आहे. गल्लीबोळात आर्यन्सच्या जयघोषांचे सूर घुमत आहेत, तर स्थानिक मंडळांनी विजेत्यांचे स्वागत सोहळे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचा उत्साह पाहता,येणाऱ्या वर्षांतही आर्यन्स गोविंदा पथक आपला वर्चस्व टिकवून ठेवेल,अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.

