गौ-रक्षकांवर खोतांचा गब्बर वार नाशिक-मालेगावात आंदोलनाची चिन्हे… संतप्त हिंदू समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत गुन्हा दाखल करण्याची मागणी…

0
5

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य सदाभाऊ (सदाम) खोत यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. खोत यांनी गौ-रक्षकांना शिकारी, दलाल आणि डाकू गब्बर सिंह असे संबोधले. या विधानामुळे हिंदू समाज आणि विविध गौ-रक्षक संघटना संतप्त झाल्या असून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नाशिकमधील गौ-रक्षकांनी सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये खोत यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरून कठोर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.गौ-रक्षकांच्या निवेदनात खोत यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153अ (समाजात वैमनस्य पसरविणे), 295अ (धार्मिक भावना दुखावणे),298 (जाणीवपूर्वक अपमान), 500 (मानहानी), 504 (शांततेस बाधा आणणारे अपमानजनक शब्द) आणि 505(2) (गटांमध्ये वैरभाव निर्माण करणे) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे…

गाय ही हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते. तिचे रक्षण करणाऱ्यांचा अपमान हा थेट धार्मिक भावना दुखावणारा गुन्हा असल्याचा गौ-रक्षकांचा ठाम दावा आहे. यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खोत यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांनी खोत यांच्या शब्दांना गैरजबाबदार आणि धार्मिक भावनांचा अपमान करणारे असे ठरवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, खोत यांचे समर्थक मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत आहे असे सांगत आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे डॉ. चैतन्य देवरे यांनी खोत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “गौ-रक्षकांवर अशा प्रकारे शब्दांचा मारा करणारा आमदार निवडून दिल्याचा लाजिरवाणा अनुभव समाजाला आला आहे. खोत यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.आता सर्वांचे लक्ष खोत यांच्या भूमिकेकडे लागले आहे.ते आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागतील का?की गौ-रक्षकांच्या संतप्त आंदोलनामुळे नाशिक-मालेगाव परिसरात रस्ते पेटणार?या प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत स्पष्ट होतील.मात्र खोत यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक वातावरणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे, एवढे मात्र निश्चित.