पनवेल शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. परंतू प्रकल्पग्रस्तांनी दैवत मानलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख तसेच बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना सोमवारी देण्यात आले.
रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका आणि जिव्हाळ्याच्या या विषयावर राज्य सरकारने सुद्धा पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र या विमानतळाच्या उदघाटनाच्या वावड्या उठू लागल्या तरी केंद्र शासनामार्फत दिबांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नाही. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यात उभे राहिले आहे. त्यामुळे येथील जनतेने विकासाच्या दृष्टीने आपली कसत असलेली जमीन विमानतळाला दिली. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने विकासात कोणताही अडसर आणण्यात आला नाही, त्यामुळे विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव केंद्र शासनाने जाहीर करावे यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय कडू, जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, विशाल सावंत, सनीप कलोते, लालचंद यादव, आण्णासाहेब अहेर, चंद्रकांत शिर्के, महिला पदाधिकारी रुपाली शिंदे, दीपाली पारसकर आदी उपस्थित होते.