उरणकरांचे मतच ठरवेल कमळ फुलणार की ‘मशाल’… उरणची निवडणूक फक्त सत्तेची नव्हे, तर प्रतिष्ठेची लढाई…

0
17

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):- 

उरण नगरपालिकेच्या सत्तेवर कोण बसणार हा प्रश्न आता प्रत्येक उरणकराच्या चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपने सुसाट वेग घेतला असताना महाविकास आघाडी अद्याप एकमत शोधण्यात गोंधळलेली आहे.नगराध्यक्षा पद महिला राखीव ठरल्याने राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे.निवडणुकीची रणशिंगे वाजली असून, १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे.त्यासह उरणच्या प्रत्येक गल्लीबोळात राजकीय धुरळा उडालेला आहे.२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असून,फक्त काही आठवड्यांतच उरणच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.भाजपने नगरसेवक आणि नगराध्यक्षा पदासाठी आपले उमेदवार निश्चित केले असून प्रचारयंत्रणा जोरात सुरू केली आहे.मात्र, महाविकास आघाडीत अद्यापही उमेदवार निवडीवर एकमत झालेलं नाही.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उमेदवारी निश्चित केली असली तरी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस-शेकाप यांच्यात समन्वयाचा तुटवडा स्पष्ट दिसतो. राजकीय पातळीवर ही विसंगती आघाडीच्या गळ्याला पडलेला फास ठरत आहे.उरण नगरपालिकेत एकूण १० प्रभागांमधून २१ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षा असे २२ लोकप्रतिनिधी निवडले जाणार आहेत.एकूण १३,३११ पुरुष आणि १२,९०३ महिला, असे मिळून २६,२१४ मतदारांचे भवितव्य उरणचं राजकीय समीकरण बदलणार आहे.प्रभागनिहाय पाहता प्रत्येक ठिकाणी तोंडओळख असलेल्या कार्यकर्त्यांमध्येच थेट लढत होण्याची शक्यता आहे.प्रभाग १ ते ९ मधून प्रत्येकी २ नगरसेवक, तर प्रभाग १० मधून ३ नगरसेवक निवडले जाणार आहेत.महिला राखीव नगराध्यक्षा पदामुळे पक्षांच्या रणनीतीत मोठी उलथापालथ झाली आहे.भाजपकडून सक्षम महिला उमेदवारांची शॉर्टलिस्ट तयार करण्यात आली असून,आघाडी मात्र अजूनही “कोणाला पुढे करायचं?” या द्विधा मनःस्थितीत आहे.यामुळे भाजपला स्पष्ट मानसिक आघाडी मिळाल्याचं मानलं जातं.राष्ट्रवादीचा प्रभाव जवळपास शून्यावर, काँग्रेस आणि शेकापचे अस्तित्व “कागदावर” एवढेच राहिले आहे.दुसरीकडे, भाजपची मोहीम सुसंघटित आणि आक्रमक सुरू आहे.महाड, पनवेलनंतर आता उरणमध्येही कमळ फुलणार का, हा प्रश्न चर्चेत आहे.उरणकरांचे मतच ठरवेल ‘कमळ’ फुलणार की ‘धनुष्यबाण’ लागणार लक्ष्यावर… या निवडणुकीत केवळ सत्ता नाही, तर उरणच्या विकासाचा मार्ग आणि आगामी पाच वर्षांचा नकाशा ठरणार आहे.