वृत्तपत्रातील बातमी तथ्यहीन, नोटिशीचा गैरअर्थ लावून खोटा प्रचार… सरपंच महेश विरले यांनी तथ्यांसह मांडले स्पष्टीकरण…

0
7

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या या तथ्यहीन, दिशाभूल करणाऱ्या आणि ग्रामपंचायतीची तसेच त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेची बदनामी करण्याच्या उद्देशाने मुद्दाम पसरवल्या गेल्याचा आरोप करत विरोधकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चुकीच्या बातम्यांचा फोलपणा उघड करण्यासाठी त्यांनी संबंधित शासकीय दस्तऐवजांसह माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

सरपंच विरले यांनी सांगितले की, नेरळ संकुल विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या नोटिशीत कुठेही बांधकाम उल्लंघनाचा उल्लेख नाही. “उजव्या बाजूला बाधकाम असल्याचा निष्कर्ष काही प्रतिनिधींनी चुकीच्या पद्धतीने काढून वृत्तपत्रांना चुकीची माहिती दिली. ही माहिती केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी हेतुपुरस्सर पसरवण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.

उपअभियंता निलेश खिल्लारे यांनी अधिकृतरित्या पाठवलेल्या नोटिशीत कोणत्याही प्रकारच्या गैरकायदेशीर बांधकामाची नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, संबंधित कामाला नेरळ विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता देखील असल्याचे सरपंचांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरातील दुरुस्ती कामे, चौकाचा विकास किंवा समता समितीमार्फत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.नवीन विकास आराखडा (DP) बदलाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, संबंधित रस्त्याची इमारत रेषा 37.50 मीटरवरून 15 मीटरवर करण्यात आली असून, त्यानुसारच काम सुरू आहे. “नियमांचे पूर्ण पालन करूनच ही कामे होत आहेत. महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांना आवाहन केले की, “चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्तींची पडताळणी करूनच बातमी प्रसिद्ध करा. असत्य प्रचाराने जनतेची दिशाभूल होऊ नये.सरपंच विरले यांनी केलेल्या या स्पष्ट आणि दस्तऐवजाधारित खुलाशामुळे ग्रामपंचायतीविरोधातील प्रचाराला जोरदार उत्तर मिळाले आहे.