पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कलच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू होणार आहे, त्याच भागात अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेले सार्वजनिक शौचालय आणि आधुनिक बस थांबा आता तोडावा लागणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी थेट पालिका प्रशासनाच्या कारभारावर हल्लाबोल करत, जनतेच्या पैशांची ही अक्षम्य उधळपट्टी कशासाठी केली, असा संतप्त सवाल विचारला आहे.कळंबोली सर्कल विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना, पालिकेने तब्बल ३० ते ३५ लाख रुपये खर्चून शौचालयाचे आणि लाखो रुपये खर्चून बस थांब्याचे नवीन बांधकाम केले. आता हे बांधकाम बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर आक्रमक भूमिका घेत प्रदीप ठाकूर म्हणाले, “कळंबोली सर्कलच्या विस्तारीकरणाची कल्पना पालिका प्रशासनाला नव्हती का? जर होती, तर जनतेच्या पैशांची अशी ‘होळी’ का करण्यात आली? एका बाजूला महामार्ग प्राधिकरणाकडून बांधकामे आणि वृक्षतोडीच्या नोटिसा दिल्या जात असताना, त्याच ठिकाणी पालिकेने ऐनवेळी ३५ लाख रुपये खर्ची घालून हे शौचालय उभे केले. यातून पालिकेने काय साधले?”
प्रदीप ठाकूर यांनी मागणी केली आहे की, नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशांची ही उधळपट्टी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर त्वरित कारवाई झालीच पाहिजे. नवीन बांधकाम तोडण्याची वेळ आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे.

