निवडणूक काळात हत्यारासह फिरणारा राजस्थानचा युवक पोलिसांच्या रडारवर… परदेशी पिस्तूल महाडमध्ये कशासाठी?कोणाच्या इशाऱ्यावर ‘खेळ’ सुरू?

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शहरात अभूतपूर्व गोंधळ आणि हिंसाचार उफाळला आहे… लोकशाहीच्या उत्सवात राजकीय गुंडगिरीचा धिगाणा पाहायला मिळाला असून,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान राड्यामुळे महाड शहर हादरले आहे. हा केवळ वाद नव्हता,तर सत्तेसाठी हाणामारी आणि दगडफेक करणारा एक भीषण राजकीय संघर्ष होता!

मतदान सुरू असतानाच अचानक दोन गटांमध्ये तणाव वाढला आणि त्याचे रूपांतर थेट युद्धात झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांवर या राड्यात क्रूर हल्ला करण्यात आला, ज्यात गाड्यांचे मोठे नुकसान झाले. नेत्यांच्या गाड्यांची तोडफोड हा थेट कायदा-सुव्यवस्थेवरचा हल्ला आहे.

या गोंधळानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, पोलिसांनी तपासणी केली असता जो प्रकार समोर आला, तो अत्यंत गंभीर आणि भयानक आहे! जाबरे यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या तपासणीत, लाठ्या-काठ्यांसोबतच एक पिस्तूल सापडले आहे.या पिस्तुलाचे ‘कनेक्शन’ थेट राजस्थान आणि जम्मू-काश्मीरपर्यंत!हे पिस्तूल जम्मू-काश्मीरमध्ये नोंदणीकृत आहे.पिस्तुलाचा मालक राजस्थानचा रहिवासी आहे.तो युवक गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाडमध्ये गुप्तपणे वास्तव्य करत होता.निवडणुकीच्या काळात परराज्यातील व्यक्तीकडे आणि तीही पोलिसांना कोणतीही माहिती न देता पिस्तूल सापडणे हा राजकीय षडयंत्राचा स्पष्ट संकेत आहे. महाडमध्ये मतदानाच्या दिवशी हा युवक नेमका काय करत होता? राजकीय नेत्यांच्या ताफ्यात हे पिस्तूल आलेच कसे? यामागे मोठा कट असल्याचा संशय आहे.

राजकीय वैमनस्यातून थेट हिंसेचा वापर आणि शस्त्रप्रदर्शन होणे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणुकीच्या सुरक्षेचा दावा करणाऱ्या प्रशासनाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल केले असले तरी, या प्रकरणाची मुळे खोलवर तपासणे गरजेचे आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असला तरी, शहरातील तणाव कायम आहे. महाडमध्ये शांतता राखणे हे पोलिसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. या हिंसक वातावरणात नागरिक भयभीत झाले आहेत…