उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील नवघर–खोपटा रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (वय 38) यांचा जागीच मृत्यू झाला. बाँमण लाँडी यार्डजवळ दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल ठाकूर हे सोमवारी दुपारी मोटारसायकलवरून खोपटा गावाकडे जात होते. त्याचवेळी नवघर–खोपटा रस्त्यावरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर ट्रेलर (एमएच 42 बीयू 5072) ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कंटेनरने अमोल यांना काही अंतर फडफडत नेले. गंभीर जखमेमुळे अमोल ठाकूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर थांबवून चालकासह वाहन ताब्यात घेतले. या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले व त्यांनी घटनास्थळी रास्तारोको केला. रस्त्यावर वाहतूक काही काळ ठप्प झाली.
घटनेची माहिती मिळताच भेंडखळ गावातील नागरिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा भावना ताई घाणेकर यांनी पोलिसांना अपघाताबाबत कळविले. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी संतप्त नागरिकांना शांत राहण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अमोल ठाकूर हे भेंडखळ गावातील रहिवासी असून त्यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. उरण पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

