कार्यतत्परतेचा सन्मान; सौ. नंदिनी वाले अध्यक्ष…

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

एकता मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. नंदिनी भीमसेन वाले यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खांदाड परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या या प्रतिष्ठित मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मंडळाच्या कार्याची दखल घेत स्थानिक नागरिकांसह हितचिंतकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सन २०२६ सालातील एकता मित्र मंडळाची पहिली त्रैमासिक बैठक रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी भीमसेन वालेराव यांच्या निवासस्थानी, खांदाड येथे पार पडली. याच बैठकीत सौ. नंदिनी भीमसेन वाले यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीदरम्यान उपस्थित ज्येष्ठ सदस्य किशोर डोंगरे यांनी सौ. नंदिनी वाले यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व सदस्यांनी त्यास एकमुखाने अनुमोदन दिल्यानंतर सौ. नंदिनी वाले यांनी अत्यंत नम्रतेने अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, एकता मित्र मंडळाचे मावळते कार्याध्यक्ष सुनील धुमाळ यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली असून, मंडळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शन करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. नंदिनी वाले तसेच मावळते कार्याध्यक्ष सुनील धुमाळ यांचा लवकरच सत्कार समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी महिलांसाठी ‘हळदी-कुंकू’ कार्यक्रम तसेच सर्व सदस्यांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

सौ. नंदिनी वाले या शिक्षणक्षेत्राशी संबंधित असून, एकता मित्र मंडळातील अत्यंत सक्रिय व कार्यतत्पर सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. कामकाज हाताळण्याचा अनुभव, उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि प्रभावी टीम मॅनेजमेंट यामुळे त्यांनी मंडळातील ऐक्य व शिस्त कायम ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘एकता’ या नावाप्रमाणे सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य त्यांनी नेहमीच केले आहे.

एकता मित्र मंडळाच्या स्थापनेतही सौ. नंदिनी वाले या अग्रणी सदस्यांपैकी एक होत्या. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेले “एकता मित्र मंडळ” आता चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या सर्व त्रैमासिक बैठकींना त्या एकदाही अनुपस्थित राहिलेल्या नाहीत, ही बाब त्यांच्या कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण ठरते.

दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या त्रैमासिक बैठकीत मंडळाच्या बैठकीसाठी कायमस्वरूपी ठिकाण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, पुढील सर्व बैठका भीमसेन वालेराव यांच्या निवासस्थानी घेण्याचे ठरले. या निर्णयास सौ. नंदिनी वाले यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, मंडळाच्या हितासाठी आपले निवासस्थान आनंदाने उपलब्ध करून दिले. त्यानुसार, सन २०२६ मधील पहिली बैठक याच ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडली.

सौ. नंदिनी भीमसेन वाले यांच्या अध्यक्षपदी निवडीची माहिती एकता मित्र मंडळाच्या व्हॉट्सॲप गटावर प्रसारित होताच ती परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. दिवसभर त्यांना मंडळाचे सदस्य, स्थानिक नागरिक तसेच हितचिंतकांकडून अभिनंदन व शुभेच्छांचे संदेश प्राप्त होत होते.