दि.अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या प्रशासकीय इमारतीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा; महाडमध्ये दिग्गज नेत्यांची उपस्थिती… 

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

“आपली बँक…आपली माणसं” या ब्रीदवाक्यावर विश्वासाचा भक्कम पाया रचत गेली तब्बल ९५ वर्षे रायगड जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक जीवनात अखंड सेवा बजावणाऱ्या दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेडच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे सायंकाळी ४ वाजता करण्यात आले आहे.

सहकार महर्षी व आदर्श संचालक स्व. अण्णासाहेब सावंत यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली ही बँक आज रायगडमधील विश्वासार्ह सहकारी वित्तसंस्थेचा आदर्श मानली जाते. ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि सामाजिक बांधिलकी यामुळे बँकेने सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी वर्गाचा विश्वास संपादन केला आहे. ISO 9001:2015 मान्यताप्राप्त असलेली ही संस्था आधुनिकतेची कास धरत नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून आणखी सक्षम होत आहे.

या लोकार्पण सोहळ्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनीलजी तटकरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. कु. आदितीताई तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले, महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. सुनीलजी कविस्कर, माजी नगराध्यक्षा मा. स्नेहल माणिक जगताप यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे.

बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शोभा सुधाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व कर्मचारीवर्गाच्या एकत्रित प्रयत्नातून हा सोहळा साकारत आहे. नव्या प्रशासकीय इमारतीमुळे बँकेच्या सेवा अधिक वेगवान, सुलभ व आधुनिक होणार असून महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या मंगलमय आणि ऐतिहासिक क्षणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.