रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
२४ जानेवारी रोजी शारीरिक शिक्षण दिनानिमित्त शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कवायत संचालन, मार्च पास तसेच लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध कवायत व तालबद्ध लेझीम सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती स्पष्टपणे दिसून आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
हा कार्यक्रम आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील व शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. शारीरिक शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

