रेल्वेची धडक बसून ६२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू… 

0
1

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

रेल्वेची धडक बसून एका ६२ वर्षीय व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रसायनी परिसरात घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव हिरू पांडू चिन्ना राठोड (वय ६२ वर्षे) रा.कष्टकरी नगर,पो.गुळसुंदे ता. पनवेल,जि.रायगड असे आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.७ फेब्रुवारी रोजी मतदान करून ते घरी परतत होते. यावेळी रसायनी रेल्वे स्टेशनजवळील फाटक परिसरात रेल्वे रुळ ओलांडत असताना पनवेलकडून पेणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे येण्याची कल्पना न आल्याने त्यांना रेल्वेची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती भीमु राठोड यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात पाठवला या घटनेमुळे कष्टकरी नगर परिसरात शोककळा पसरली आहे. सदर घटनेची रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन शेडगे हे करीत आहेत.