अफलातून “बोलंदाज” आऊट… द्वारकानाथ संझगिरी ७४वर बाद… जेष्ठ क्रिकेट समीक्षक संझगिरी यांचे निधन…

0
72

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

द्वारकानाथ संझगिरी उर्फ पप्पू एक सिद्धहस्त लेखक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे पत्रकार, टेलीव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते. ते शिक्षणाने स्थापत्य अभियंता होते आणि मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते.

त्यांचा जन्म दि. १५ नोव्हेंबर १९५० रोजी मुंबईत दादरच्या  हिंदू कॉलनी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया कॉलेजमध्ये झाले. यानंतर व्ही.जे.टी.आय. मधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केले. क्रीडा क्षेत्रातील समीक्षणाबरोबरच संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. सन २००८ मध्ये ते मुख्य अभियंता आणि त्यानंतर पाणीपुरवठा प्रकल्पाचे प्रमुख अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले.

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ते स्टॅण्ड अप टॉक-शो करत होते.क्रिकेट समीक्षण क्षेत्रात त्यांचा मोठाच दबदबा होता. द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून ते आजतागायतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक Sports News देखील कव्हर केलेले आहेत. प्रमुख माध्यमांसह पुस्तकांच्या माध्यमातून द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रीडा विषय सर्वसामान्यांना समजावून सांगितला.क्रिकेट क्षेत्राप्रमाणे त्यांचा चित्रपट क्षेत्रातील देखील गाडा अभ्यास होता. जवळपास पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत, पण इतर काही भाषांमध्येसुद्धा तसेच इंग्रजी मध्ये देखील स्तंभ-लेखन केले आहे.क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसत होते. क्रीडा क्षेत्राबरोबरच त्यांचा चित्रपटांनाही दांडगा अभ्यास होता, याविषयी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिलेली आहेत.सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक” आणि “श्री ” यांसारख्या मासिकांमध्ये नियमित योगदान दिले आहे.
टीम-इंडियाने १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक नावावर केला होता, या विश्वचषकानंतर इतर काही मित्रांसह  “एकच षटकार” एक क्रीडा मासिक सुरू केले होते, त्यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते, संदीप पाटील यांनी संपादक म्हणून काम पाहिले होते.सन १९८० या दशकाच्या उत्तरार्धापासून आज दिनांक, सांज लोकसत्ता, मिड-डे, तरुण-भारत, पुढारी आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन लिहायला सुरुवात केली. लोकसत्ता मधील त्यांचे क्रीडा-लेख आणि प्रवास वर्णन संबंधित स्तंभ खूप गाजले. संझगिरी २५ वर्षांहून अधिक काळ सामना या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर करीत होते.विक्रमवीर लिटल मास्टर सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ ते अलिकडील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पर्यंतच्या सर्व क्रिकेट सेलिब्रिटींचे वाढदिवस व सत्कार समारंभ कव्हर केलेले आहेत.

संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा जगत् आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.मात्र अशा दैदिप्यमान आंतरराष्ट्रीय किर्ती मान प्राप्त क्रिकेट समीक्षकाने वयाच्या ७४व्या वर्षी काल दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी वांद्रे येथील लिलावाती हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ काळ आजाराशी सामना करता करता अखेरचा श्वास घेत आपली विकेट गमावली आहे.द्वारकानाथ संझगिरी आपल्यातून जरी गेले असले तरी क्रिकेट रसिकांच्या हृदयात ते कायम राहतील यात दुमत नाही. त्यांच्या जाण्याने एकूण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले आहे.

सर्व क्रिडारसिक आणि संझगिरी यांचे चाहते यांच्या आणि शिवसत्ता टाईम्स, नवी मुंबई या वृत्त संस्थेचा सह-संपादक म्हणून मी, देवेंद्र मोरे आमच्या समस्त कार्यालयीन सहकारी वृंदासह दिवंगत पत्रकार मित्र द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि ईश्वरचरणी त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळो अशी प्रार्थना करतो…