उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
उरण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवला आहे.
नगराध्यक्ष पदाची चुरस थेट नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळाली.महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांना ९,२१० मते मिळाली,तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या शोभा कोळी यांना ७,७४० मतांवर समाधान मानावे लागले. भावनाताई घाणेकर यांनी १,४७० मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उद्धव कदम यांनी या विजयाची अधिकृत घोषणा केली.
नगराध्यक्ष पद महाविकास आघाडीने खेचून आणले असले, तरी नगरसेवक पदाच्या निवडीत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरसेवक पदासाठी भाजपचे १२ उमेदवार निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे नगर परिषदेच्या सभागृहात सत्ता स्थापन करताना आणि निर्णय घेताना दोन्ही बाजूंनी मोठी कसरत पाहायला मिळणार आहे. मतदारांनी नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुमत दुसऱ्या पक्षाला देऊन उरणमध्ये ‘बॅलन्स’ राजकारण केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उरण शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला. “हा विजय उरणच्या जनतेचा आणि विकासाचा विजय आहे,” अशी भावना नवनियुक्त नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय पातळीवर डॉ. उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. या निकालामुळे आता आगामी पाच वर्षांत उरण शहराच्या विकासाची धुरा कोणाकडे आणि कशी असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

