चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी राज्या बाहेर जाऊन पर राज्यात अविष्कार भरारी घेतल्याने, आविष्कार अभियान यशस्वी केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
रायगड जिल्हा परिषद आयोजित, केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४/२५ राष्ट्रीय अविष्कार अभियानाच्या राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन मध्यप्रदेश येथील प्रादेशिक विज्ञान भवन, भोपाळ येथे आयोजित करण्यात आले होते. या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सहा शाळांची निवड करण्यात आली होती. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्ह्यात प्रथम व विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव, तालुका खालापूर शाळेचे आठ विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तळोदे, पाचनंद, पनवेलचे चार विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खारपाडा, पेणचे सहा विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खोपटे उरणचे आठ विद्यार्थी, विर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर, गिरीस्थान, माथेरान, कर्जतचे तेरा विद्यार्थी व शासकीय आश्रम शाळा पिंगळस, कर्जतचे सहा विद्यार्थी असे एकूण ४५ विद्यार्थी वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या नोडल अधिकारी नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. व्यवस्थापक म्हणून सौ. सुष्मा धूर्वे यांची नियुक्ती जिल्हा परिषद रायगड यांनी केली होती. संतोष चाटसे, माथेरान, सौ. नंदिनी कदम शाळा खारपाडा, श्रीम. विभावरी सिंगासने शाळा तळोदे, पाचनंद, श्रीम. अमृता तोडकर शाळा, खोपटे सौ. सिमा डोंगरे अधिक्षक शासकीय आश्रम शाळा, पिंगळस यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिर, गोदाघाट, प्रादेशिक विज्ञान केंद्र, भोपाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, आदिवासी जनजाती म्युझियम, वनविहार प्राणी संग्रहालय, नौकानयन, राजा भोज तलाव, जगप्रसिद्ध ताज उल मस्जिद, मोती मस्जिद, कर्करेषा, सांची स्तूप, पीपल्स मॉल व भीमबेटका इत्यादी स्थळांची भेट व अभ्यास करण्याची संधी मुलांना देण्यात आली. प्रादेशिक विज्ञान भवनात तारामण्डल रचना, निर्मिती यावर 3D शो दाखवण्यात आला. प्रेक्षणीय स्थळे व पर्यटनाचा आनंद मुलांनी लुटला. या कार्यक्रमाच्या प्रमुख रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी मुलांना प्रवास व सहली दरम्यान सतत संपर्कात राहून व्हिडिओ कॉल वरून नियमित सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच रायगड जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड साहेब यांनी सुद्धा व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सहलीबाबत जाणून घेतले. उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे साहेब, शेडगे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुप्रीमो टूर्स यांनी सहलीसाठी उत्तम सुविधा व सुसज्ज बस, राहण्याची व भोजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत करण्यासाठी ही एक पर्वणीच होती. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अशा सहलीचे आयोजन महत्त्वाचे आहे. केंद्रीय प्रकल्पांतर्गत MPSP च्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मुलांचे व शिक्षकांचे अभिनंदन पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी केले.