कोकण आयुक्तांची कर्जत प्रशासकीय भवनाला अचानक भेट… शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा घेतला मागोवा…

0
32

कर्जत शिवसत्ता टाइम्स (नरेश जाधव):-  

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवार दि. 11 एप्रिल 2025 रोजी कर्जत येथील प्रशासकीय भवनाला अचानक भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “100 दिवसांचा कृती आराखडा” या विशेष उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली. यावेळी त्यांनी नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि त्याविषयी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

कर्जत प्रशासकीय भवनात अद्यापही लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब गंभीर मानून आयुक्तांनी प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ आणि तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना तातडीने लिफ्टची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. अपंग नागरिक अमर साळोखे यांनी भवनात ये-जा करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या, त्यावर आयुक्तांनी अपंगांसाठी रॅम्प व सुलभ प्रवेशाची तात्काळ व्यवस्था करण्याचेही निर्देश दिले.

यावेळी कोकण आयुक्तांनी कर्जत येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनेही काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. प्रांताधिकारी संकपाळ व तहसीलदार जाधव यांनी सांगितले की, या कार्यालयाचे काम सुरू असून नागरिकांना लवकरच त्याचा लाभ मिळणार आहे…100 दिवसांचा कृती आराखडा” अंतर्गत सात प्रमुख बाबींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात संकेतस्थळ विकास, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय भेटी यांचा समावेश आहे.

या भेटीत ई-ऑफिस, जिवंत सातबारा आणि विविध डिजिटल प्रकल्प राबवण्यावरही भर देण्यात आला… लवकरच कर्जत तहसीलमधील सेवा अधिक पारदर्शक, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख होणार आहेत…भेटीदरम्यान प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ,तहसीलदार डॉ.धनंजय जाधव आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते…कोकण आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले…शासनाचा उद्देश शिस्तबद्ध प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा देण्याचा असून, आगामी 100 दिवसांत कोकण विभागातील शासकीय कार्यालये नव्या जोमाने सुधारणा व सेवा कार्यवाही करताना दिसतील,असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला…