उरणमध्ये आपदा विभागाकडून मॉक ड्रिलचे सादरीकरण… बॉम्ब फुटल्यावर व आग लागल्यावर परिस्थितीचे केले निवारण…

0
39

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):- 

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिलचे उरणमध्ये आपदा विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.यावेळी पोलिस प्रशासन, अग्निशामक दल, नागरी संरक्षण विभाग, उरण आरोग्य विभाग, आपदा विभाग इत्यादींचे अधिकारी, जवान व कर्मचारी उपस्थित होते.

केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्याच्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या आपत्कालीन परिस्थितींसाठी व  कायदा सुव्यवस्थेची सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे सादरीकरण करण्यात आले.या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला गेला.यावेळी उरण तालुक्यातील एन आय हायस्कूल येथे बॉम्ब फुटल्यावर व आग लागल्यावर कश्या प्रकारे आग विझवावी, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, स्वतःचे व इतरांचे रक्षण कसे करावे इत्यादी बाबींवर आधारित मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.यावेळी जखमी शालेय मुलांना सुरक्षित रित्या बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच  बॉम्ब फुटल्यावर आग लागल्यावर शाळेतील मुलांनी आपला जीव वाचविण्यासाठी शाळेच्या इमारती मधून खाली येऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला.उरण शहरातील तहसिल कार्यालय, ओ एन जी सी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जी टी पी एस कंपनी बोकडविरा, बारमर लॉरी भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी कोप्रोली, बल्क गेट कंपनी मोरा या सात ठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत.नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी  यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे यावेळी आपदा विभागाकडून सांगण्यात आले.