माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या माणगाव तालुक्यातील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कविलवहाळ आदिवासीवाडी येथील शालिनी अरुण रमेश वालेकर ही गर्भवती महिला १ जून रोजी पहाटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. सुरुवातीला सामान्य प्रसूतीचा प्रयत्न झाला, मात्र सी.पी.डी. असल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया गरजेची ठरली. डॉ. रामदास तरपेवाड व डॉ. सावंत यांच्या सहकार्याने सकाळी ९ वाजता सिझेरियन करण्यात आले. मात्र त्यानंतर गंभीर रक्तस्त्राव सुरू झाल्याने परिस्थिती बिकट झाली. रक्तस्त्राव थांबत नसल्यामुळे गर्भपिशवी काढण्याची वेळ आली, पण सर्जन आणि वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने संकट गडद होत होते. यावेळी डॉक्टरांनी अतुलनीय चिकाटीने आणि सहकार्याने पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉ. गौतम राऊत यांनी बाहेर असतानाही वेळेवर येऊन सायंकाळी ७.३० वा. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भूलतज्ज्ञ डॉ. सावंत, डॉ. श्रुती निकम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुणा पोहरे, डॉ. तरपेवाड यांच्यासह संपूर्ण ऑपरेशन थिएटर स्टाफ—शिवक्रांती गवळी, सिस्टर मोकाशी, अनिता करकरे, दिपाली नेमाणे, वनिता तेटगुरे, लता, प्रणिता, राजेंद्र ब्रदर, संजय देसाई, अशोक महाडिक, जगदीश, नितीन गायकवाड यांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्ण शुद्धीवर आली व सुरक्षित आहे. या संपूर्ण वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टरांचा रुग्णालयात सन्मान करण्यात आला व रुग्ण महिलेलाही साडी व बाळासाठी कपडे देऊन गौरवण्यात आले. माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे आदिवासी भागातील महिलांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनदायिनी’ ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाले.