रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय. साजे ते कामत असा 12 KM चा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. तज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा थरार बिनधास्तपणे अनुभवतात. पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभवू पाहत आहेत… हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलाड रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करून आगळी वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे. 18 वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो. कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते.
आता कोलाडच्या रिव्हर राफ्टिंगकडे पर्यटकांची पाऊले वळली असून इथं मोठी गर्दी उसळलीय.थरार,साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळतेय. पावसाळ्यात कोलाड मध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावतायेत.पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटक ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात.सध्या राज्यभरातील मोठं मोठे युवक युवतींचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसतेय. राज्यभरातून कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवून मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे बहरून निघालीत.