रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्ताने रोहा पोलीस ठाण्याच्यावतीने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शन सत्र,शपथ विधी व भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दि. 20 जून ते 26 जून 2025 या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करण्यात आला.हे सर्व उपक्रम पोलीस निरीक्षक श्री.मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
सकाळी 9.30 वाजता सी.डी.देशमुख हायस्कूल,अष्टमी येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी “नशा मुक्तीची” शपथ घेतली.11 वाजता मेहंदळे हायस्कूल, रोहा येथेही विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्रात अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, कायदेशीर शिक्षा, व समाजातील परिणाम यावर सखोल चर्चा झाली.
दुपारी 1.00 ते 2.00 दरम्यान सी. डी. देशमुख शाळा,मंगळवाडी येथून सुमारे 60 ते 70 विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहभागातून एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.”नशा मुक्त भारत”, “अंमली पदार्थांना नकार” अशा घोषणा देत रॅलीने राम मारुती चौक, नगरपरिषद, तीन बत्ती नाका, बाजारपेठ मार्गे पुन्हा शाळेमध्ये परत येत परिसरात जनजागृतीचा जागर केला.
या उपक्रमांसाठी पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी,नशेपासून दूर राहण्याचे महत्त्व आणि कायद्याचे भान जागवले.त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.अशा प्रकारचे उपक्रम युवकांमध्ये सजगता निर्माण करून त्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी मोलाचे ठरतात, असे मत अनेक शिक्षक व पालकांनी व्यक्त केले…