चौक,वासंबे,वडगांव-वाशिवली, मोहपाडयात वीजपुरवठा वारंवार खंडित… वीजपुरवठा अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना आमदार बालदी यांचा सज्जड दम…

0
6

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

उरण विधानसभा मतदारसंघातील चौक,वासंबे,वडगांव-वाशिवली, मोहपाडा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनतेत संताप आहे. दिवसाला पाच तासांपर्यंत वीजपुरवठा बंद राहणे, ट्रान्सफॉर्मर वेळेवर न मिळणे, कर्मचारी तुटवडा, तक्रारींना प्रतिसाद न मिळणे अशा समस्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर चौक येथे जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता पेण, वीजपुरवठा अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाली…बैठकीत आमदार बालदी यांनी कामात सुधारणा करा,अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोषी अधिकारी-कर्मचारी यांना घरचा रस्ता दाखवला जाईल” असा इशारा दिला.

बैठकीत भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जि.प. सदस्य मोतीराम ठोंबरे, स्थानिक सरपंच, व्यापारी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी मांडल्या. रेल्वे मार्गाच्या कामामुळे वारंवार वीज वाहिन्या तुटूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

अधीक्षक अभियंता धनराज बीळकड यांनी नवीन वीज जोडणी, पायाभूत सुविधा उभारणी, सदोष ट्रान्सफॉर्मर बदलणे, RDSS योजनेअंतर्गत वितरण प्रणालीत सुधारणा याबाबत माहिती दिली. सर्व कामे गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

या आश्वासनांचा आढावा घेण्यासाठी २ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार असून, अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आमदार बालदी यांनी दिला आहे.