पनवेलमध्ये पोलखोल धडक मोर्चा…मालमत्ता कर माफीची जनतेची हाक… शास्ती माफी नव्हे, मालमत्ता कर माफ करा…पनवेलकरांचा मोर्चा…

0
75

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-

पनवेल महानगरपालिकेकडून शास्ती (दंड/व्याज) माफी योजना जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मालमत्ता कर माफी न मिळाल्याने विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना आणि प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “पोलखोल धडक मोर्चा” काढण्यात येणार आहे.हा मोर्चा बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पनवेल महानगरपालिका कार्यालयाकडे निघेल. मोर्चात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की,महानगरपालिकेची “शास्ती माफी” योजना म्हणजे फक्त व्याज आणि दंडाची माफी असून प्रत्यक्ष मालमत्ता करात कोणतीही सूट नाही.सत्तेत येताना ५ वर्ष करवाढ न करण्याचे आश्वासन देऊनही कर आणि दंड वसुली सुरू आहे.’ड’ वर्गातील पनवेल महानगरपालिकेचा कर दर ‘अ’ वर्गातील मुंबई-ठाण्यासारखा ठेवण्यात आला असून, तशा सुविधा मात्र उपलब्ध नाहीत.नवी मुंबई महापालिकेत ५०० चौ.मी.पर्यंतच्या घरांना करमाफी असून २० वर्ष ग्रामपंचायतीच्या दराने कर आकारला जातो, तर पनवेलमध्ये दर जास्त आहेत.स्टील मार्केटचा २६८ कोटी रुपयांचा LBT कर माफ करून सामान्य जनतेला फक्त दंड/व्याज माफी देणे ही अन्यायकारक भूमिका आहे.मोर्चाच्या माध्यमातून “जनतेची दिशाभूल थांबवा, मालमत्ता कर माफ करा” अशी ठाम मागणी केली जाणार आहे