दक्षिण रायगड सुवर्णकार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदीप नगरकर यांची एकमताने निवड…

0
2

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

दक्षिण रायगड सुवर्णकार समाज संघटना (महाड–पोलादपूर–माणगाव) यांच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी श्री. प्रदीप महादेव नगरकर यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजातील विविध स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इयत्ता दहावी बॅच १९९० च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सत्कार समारंभात श्री. नगरकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. आपल्या सहाध्यायांनी दिलेल्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्री. नगरकर यांनी समाजाच्या एकजुटीवर भर देत संघटनेच्या माध्यमातून सुवर्णकार समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले की, समाजातील तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक प्रोत्साहन व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच महाड, पोलादपूर व माणगाव परिसरातील सुवर्णकार बांधवांना एकत्र आणून संघटनेची ताकद वाढविण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री. दिनेश मिंडे, प्रफुल्ल मिंडे, अनंत कर्जत, चंद्रकांत निवाते, शिवराज उमासरे, यशवंत वांद्रे, रघुनाथ पारधी, आशिष पळसकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून श्री. नगरकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारंभाची सांगता करण्यात आली.