कोलकत्ता शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना…याचा अर्थ असा होता की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या…परंतु कुठल्याही स्त्रीवर बलात्कार करू नका…असे फलक हातात धरून कोलकात्याच्या देहविक्री करणाऱ्या शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला…या सगळ्या महिला सोनागाची या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या रेड लाईट एरियाच्या होत्या…कोलकत्ता डॉक्टरच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला…बंगालमधील मोर्चात या वेश्यांनी सहभाग नोंदवला होता…मात्र हा मोर्चा काढून या महिला एवढयावरच थांबल्या नाही तर त्यांनी आता धक्कादायक आणि क्रांतिकारी निर्णय समोर दिला आहे…कोलकत्ता येथील डॉक्टर तरुणीच्या बलात्कार हत्याप्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली ही भूमिका ऐतिहासिक आहे…त्याचबरोबर सर्वसामान्यांचे डोळे उघडणारी आहे…या माता-भगिनींनी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून महत्वाचा निर्णय घेतला आहे…की ज्याची चर्चा आता वंगभूमीमध्ये चालू आहे…नवरात्रीचा पवित्र सण उत्तर भारतात आणि ईशान्य भागात साजरा केला जातो. संपूर्ण नऊ दिवस मनोभावे देवीची पूजा केली जाते. दुर्गा देवीच्या स्थापनेपूर्वी तिची मूर्ती तयार केली जाते. आपल्यापैकी अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, दुर्गा देवीची मूर्ती बनविण्याकरिता वेश्यालयाची माती वापरली जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी गंगेची माती, गोमूत्र, शेण आणि वेश्यालयाच्या मातीचे महत्त्व असते.ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे….वेश्यागृहात पाऊल टाकणारी महिला असो वा पुरुष आत जाण्यापूर्वी सर्व पवित्रता आणि चांगुलपणा बाहेरच सोडतो त्यामुळे वेश्यागृहाच्या दारातील माती पवित्र बनते. त्यामुळे ही पवित्र माती देवीची मूर्ती बनविण्यासाठी वापरली जाते….दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल?आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल… या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे… मात्र यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे… एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे… मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे ?हा त्यांचा सवाल आहे…
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो…स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे… याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे…दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे…वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे…शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल…चार दिवसांपूर्वीच दरबारची बैठक बोलवण्यात आली होती…त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देते. गतसाली हे अनुदान 70000 रुपये होते यंदा सरकारने 85000 रुपये अनुदान देऊ केलेय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे…या स्त्रीया सोशल मीडियावर दिसत नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो…सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत….यांचे अफाट शोषण होते…तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात…त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे…ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत…जिवंत कलेवर असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात…