नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
खोपोली एक्सप्रेस हायवे जवळ सापडलेल्या बेवारस कारचे गुढ संपले नाही. सुमित जैनचा सहकारी आणि संशयास्पद कारचा मालक अमिर खानजादा याचा मृतदेह बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी पनवेलजवळ कर्नाळा अभयारण्याच्या रस्त्यावर सापडला. मुंबई-गोवा महामार्गांवर अभयारण्यात उतरणाऱ्या सर्व्हिस रोडवर आमिरचा मृतदेह टाकलेला होता. संशयास्पद कार सापडल्यानंतर आठ दिवसांनी अमिरचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.कारमधून नवी मुंबई नेरुळ पासून प्रवास केलेल्या सुमित जैनचा मृतदेह पोलिसांना पाच दिवस अगोदर सापडला होता. दोघे नवी मुंबई नेरुळ वरून मिटिंगसाठी निघाले होते. त्या दिवशी रात्री ते घरी परतले नाही. या दोघांचे मोबाईल बंद असल्याने घरच्यांची चिंता वाढली होती. शेवटी दोन्ही कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली…या तक्रारी नंतर तपास करताना, गाडीला जीपीएस सेवा असल्यामुळे कार खोपोली येथे सापडली.त्याच दिवशी सुमित जैनचा मृतदेह पेण-गागोदे जवळ शेतात सापडला होता.त्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. मात्र आमिर खानजादाच्या मृतदेहाचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.आज घटनेतील कारचा मालक व जैनचा सहकारी अमिर खानजादा याचा देखील मृतदेह सापडल्याने हा मोठया घातपातचा प्रकार असल्याचे दिसू लागले आहे. या दोघांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पण हा सगळा काय प्रकार आहे… हे षडयंत्र पोलीस तपासानंतर कळणार आहे. या हत्येच्या घटनेमुळे रायगड आणि नवी मुंबईत खळबळ माजली आहे. सुमित जैन हे महाड, माणगाव असे व्यावसायिक स्थलांतर करत नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. तर, आमिर खानजादा नवी मुंबई नेरुळमध्ये राहत होता. पण त्याचे मुळ कुटुंब रायगड मुरुड-जंजिराचे आहे.आमिर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी होता… या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांची हत्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे केली गेली आणि त्यामागे कोण आहे ?हे आरोपींच्या तपासामध्ये लवकरच उघडकीस येईल…