महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-
मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही निकृष्ट आहे. अशा गंभीर परिस्थितीत, मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आयु. अरविंद प्रकाश येवले व सचिव आयु.रोशन रामचंद्र राजवेलकर यांच्या नेतृत्वाखालील पालकांच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री. शांताराम बोरकर यांच्याकडे धाव घेतली…यावेळी शाळेतील समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली…विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याची पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शाळेतील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, पोषण आहार, व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत प्रशासनाला इशारा देण्यात आला…शाळेच्या परिसरात अशुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे…याबाबत प्रशासनाने दखल घेतली नाही तर मंडणगड तालुका संघर्ष समिती व पालक मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे…मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आयु. अरविंद प्रकाश येवले, सचिव आयु. रोशन रामचंद्र राजवेलकर, व शिष्टमंडळातील सदस्य संगीता संपत सहाद्रिक, प्रसन्ना किशोर पेशकर, कैलास हेमीद खेडुतकर, ईश्वर अलीमिया मुरलीधर, भूमिका भारत पेरसुरे, संमिनि संजय जिवंकार, अमया अजिंक्य पिंगुळकर, भरत दत्तात्रय साखळकर यांनी या समस्यांवर त्वरित तोडगा न निघाल्यास, आंदोलनाची तयारी दर्शवली आहे…