पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांची राज्यसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल वरवणे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले आहे.
पेण तालुक्यात पंचक्रोशीचे नाव आहे…माजी राज्यमंत्री स्व.भाई मोहनराव पाटील यांच्या विचारांशी प्रेरित होवून गेली अनेक वर्षाचा बालेकिल्ला म्हणून ही पंचक्रोशी नावारूपाला आहे.वडिलांनी दिलेला वारसा पुढे चालवत आज वरवणे गावचा कार्यकर्त्या खासदार झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. वरवणे, झापडी, सायमाळ, तिलोरे, दिवाणमाळ, चांदेपट्टी येथील कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत डिजेच्या तालावर मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मी खासदार झालो म्हणून हा सत्कार नसून आपल्या गावातला, आपल्या विभागातला कोणी तरी मोठा झालाय या उद्देशाने घरातल्या, कुटुंबातल्या मंडळींनी केलेला हा सत्कार आहे. गवताची लांबी जशी मातीचा गुणधर्म सांगते तसाच आपण देखील आपल्या मातीला कधी विसरणार नाही. काही तरुण नोकरी निमित्त पुणे,ठाणे येथे गेले आहेत ते पुन्हा गावात येतील आणि इथेच नोकरी करून आपला घर सांभाळतील यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे घडणार आहे.यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. येथील वडीलधाऱ्या माणसांनी जशी भाईंना साथ दिली तशी आताची युवा पिढी माझ्यासोबत आहे.या विभागातून पाच वेळा आमदार, एक जिल्हा परिषद अध्यक्ष, मला दोन वेळा आमदार आणि आता खासदार बनवला आहे.त्यामुळे मी हे कधीच विसरणार नाही असे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी बोलताना सांगितले.
यावेळी झापडी ते वरवणे अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व तरुण मोठ्या संख्येने सामील झाले होते. एकच वादा धैर्यशील दादा, धैर्यशील दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या जोरदार घोषणा कार्यकर्ते देत होते. याप्रसंगी दिनेश भाई खैरे, संदीप तोंडीलकर, सागर पाटील, दिलीप मोरे, सई पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सावंत, दशरथ येरणकर यांनी केले.