दिल्ली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहार):-
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी आयोगाने गेल्या दोन दिवसांपासून ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या चर्चेत सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, असे राजकीय पक्षांनी म्हटले. फेक न्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात, त्यावर नियंत्रणाची मागणी राजकीय पक्षांनी केली, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.या सर्व गोष्टींवर आयोगाने विचार केला आहे. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.
ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना स्थानिक वृत्तपत्र आणि चॅनलमध्ये तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, ते सांगावे लागणार आहे. तसेच राजकिय पक्षांनाही हा नियम लागू होणार आहे. त्यांना गुन्हे दाखल असलेल्या नेत्याला उमेदवारी का दिली? ते सांगावे लागणार आहे…
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत.तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे… वृद्ध मतदारांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल… असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले…