रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगडमध्ये विधानसभेचे वारे जोरदार वाहत आहेत आणि अशातच महायुतीतील असंतोष उफाळून आला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी खोपोलीतील पत्रकार परिषदेत महायुती आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांनी सत्तेत आरपीआयला 10% वाटा न मिळाल्याची खंत व्यक्त करत, “महायुतीने आमची फसवणूक केली आहे,” उदय सामंत हे फसवे पालकमंत्री असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात दोन खासदार आणि सात आमदार असूनही आरपीआय कार्यकर्त्यांना स्थान न मिळाल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पेण आणि कर्जत खालापूर मतदारसंघातून आरपीआय उमेदवार देणार असल्याचे संकेतही गायकवाड यांनी दिले आहेत. “महायुतीने आमच्याशी केलेली वागणूक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करत आहे. आम्ही पक्षश्रेष्ठीकडे आमच्या तक्रारी मांडणार आहोत व आमचा पुढील निर्णय घेणार आहोत.” त्यामुळे महायुतीतील ही नाराजी रायगडच्या राजकारणात नवीन समीकरणे उभी करू शकते असेच म्हणावे लागेल.