खालापूर शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर ) :-
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लावण्यात आली आहे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीची कामे लावण्यात आल्याने सर्वच शासकीय कार्यालये ओस पडलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु नागरिकांच्या या समस्या जर आपण प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल वृत्तपत्रातून मांडल्या किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर घणाघात केला… त्यांच्या कामावर बोट उचलले तर तुम्हाला सरळ तुरूगांची हवा खावू लागू शकते…जणू या महाराष्ट्र राज्यात, या रायगड जिल्ह्यात, या खालापूर तालुक्यात अथवा कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात आचारसंहिता नव्हे तर अघोषित आणीबाणी लावण्यात आली आहे. पत्रकार व प्रसारमाध्यमांचे सर्व हक्क गोठविण्यात आले आहेत….लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या माध्यमांना जनतेचे प्रश्न…त्यांची होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी बातमी लिहीण्याचा अधिकारच उरलेला नाही असे दिसत आहे…अशीच एक घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. खालापूर तहसील प्रशासनाबद्दल बातमी प्रकाशित केल्याबद्दल दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, कोकण प्रवाह, इंटरपोल व केपी न्यूज चैनल व पोर्टलचे मुख्य संपादक…स्वदेश न्यूज या सैटेलाईट हिंदी न्यूज चॅनलचे स्टेट सिनिअर रिपोर्टर तथा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे लढवय्ये पत्रकार फिरोज पिंजारी यांना खालापूर तहसिलदार अभय चव्हाण यांनी नोटीस बजावली असून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला असल्याने संपादक फिरोज पिंजारी यांना कधीही अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपादक फिरोज पिंजारी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सर्वोकृष्ट राज्यस्तरीय पत्रकारितेचा पुरस्कार मिळालेला आहे. फिरोज पिंजारी यांनी पत्रकारीतेतील पदव्युत्तर पदवी व राज्यशास्रातील पदवी घेतली असून 14 वर्षापासून विविध प्रसार माध्यमांमध्ये त्यांनी उपसंपादक, सहसंपादक, कार्यकारी संपादक व संपादक अशी विविधे पदे भुषविली आहेत. मागील 6 वर्षापासून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढत आहेत. भारतीय पत्रकार महासभा (BPM)…अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF)…व्हॉईस ऑफ मिडीया (VOM)…युनायटेड जर्नालिस्ट फोरम (YJF)…न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) अशा विविध पत्रकार संघटनांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर काम केलेले आहे. आज ते 16 राज्यातील 20 हजार पत्रकारांचे नेतृत्व करीत आहेत. फिरोज पिंजारी यांनी पत्रकारांसाठी अनेक आंदोलन व उपोषण केलेले आहेत. त्यांचे दैनिक कोकण प्रदेश न्यूज व कोकण प्रजा हे वृत्तपत्र आज आरएनआय (RNI) कडे नोंदणीकृत आहेत. उद्यम आधार…प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशन आज त्यांच्याकडे आहे. दिल्ली येथील डिजीटल मिडीया असोसिएशन कार्यालयात त्यांच्या पोर्टलबाबत माहितीची नोंद करण्यात आली आहे. अशा लढवय्या पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना तुरूंगात टाकण्याची रणनिती खालापूर तहसिलदार अभय चव्हाण यांनी आखली आहे. आचारसंहितेच्या नावावर तहसिलदार अभय चव्हाण पत्रकार व प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करीत आहेत.
खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्यासह काही शासकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी व काही राजकीय नेते यांना हाताशी घेवून खालापूर तहसिलदार अभय चव्हाण संपादक फिरोज पिंजारी यांना तुरूंगात डांबण्याची रणनिती आखत आहेत. यापूर्वी देखील अनेक अधिकारी व नेते यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला होता. पण उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टात भारतीय राज्य घटनेने प्रसार माध्यमांना दिलेल्या अधिकारांचा विजय झालेला आहे. खालापूर तहसीलदार यांच्या विरोधात देखील राज्यातील पत्रकार संघटना मुंबई उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्ट, ह्युमन राईट्स, देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे लेखी तक्रार करून न्याय मागतील आणि यात संपादक फिरोज पिंजारी, पत्रकारिता व भारतीय राज्य घटनेचा विजय होईल, असा विश्वास न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय सल्लागार तथा शिवसत्ता न्यूजचे मुख्य संपादक प्रविण कोळआपटे यांनी व्यक्त केला आहे…