माणिकरावांच्या लेकीने एक हाती प्रचाराची खिंड लढवली…वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या निवडणुकीला सामोऱ्या…

0
49

महाड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

महाड विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार होऊन रायगडच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील आक्रमक, अभ्यासू, दुरदृष्टी नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार माणिकराव जगताप यांनाच म्हणजे आपल्या वडीलांना पराभवाची धुळ चारणाऱ्या आणि महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असणारे बलाढ्य उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना निवडणुकीत आव्हान देणे हे मोठे धाडसच होते…आपले वडील स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या भक्कम पाठबळावर महाडच्या नगराध्यक्ष पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ हाच त्यांच्या पाठीशी असलेला राजकारणातील अनुभव. त्यामुळे स्वर्गीय माणिकरावांच्या अनुपस्थित आमदारकीची निवडणूक लढवणे हे साधे आव्हान नव्हते मात्र वडीलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची कन्या स्नेहल जगताप या मोठ्या जिद्दीने निवडणुकीला सामोऱ्या गेल्या.सोबतीला महाविकास आघाडीतील कोणतेही मोठे नेतृत्व प्रचारा दरम्यान सभा गाजवायला आलेले नसताना करारी बाणा असलेल्या माणिकरावांच्या या लेकीने एक हाती प्रचाराची खिंड लढवून विरोधी बलाढ्य उमेदवार आ. गोगावले यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण निर्माण केले. सुरुवातीला नवख्या असणाऱ्या स्नेहल जगताप यांचे आव्हान नगण्य वाटत होते मात्र जसजसा निवडणुकीला रंग चढू लागला तसतसे सत्ताधाऱ्यांना स्नेहल यांच्या उमेदवारीची दखल घेणे भाग पडले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तर स्नेहल जगताप ही आ. भरतशेठ गोगावले यांना भारी पडणार अशीच चर्चा मतदारसंघात रंगू लागली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही आपली रणनिती बदलावी लागली.महाड मतदार संघात पुर्वाश्रमीच्या काँग्रेसची व स्व. माणिकराव यांना मानणारी सुमारे ८० हजाराची मते आहेत त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची २० हजार आणि स्नेहल जगताप यांच्या रुपाने एक तरुण महिला, सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार म्हणून असलेल्या सहानुभुतीतून मिळणारी १० हजार मते मिळून महा विकास आघाडीने विजयाची समिकरणे मांडली होती. स्व. माणिकरावांच्या गेल्या तीन टर्मच्या निवडणुकीत त्यांना जितका प्रतिसाद मिळाला नाही तो प्रतिसाद स्नेहल जगताप यांना मिळत होता.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवार असल्याने माणगांव मतदारसंघातील गावात माणिकराव कधी पोचले नव्हते तेथे स्नेहलचे अभुतपूर्व स्वागत केले गेले या विभागात शिवसेनेची घरे ही बैठकीसाठी हक्काचे ठिकाण भेटले जे यापुर्वी काँग्रेसमध्ये असताना कधी मिळाले नव्हते. या साऱ्याच्या जीवावर आपल्याला विजयाची खात्री असल्याचे त्या ठासून सांगत होत्या. मात्र ज्या विभागावर आ. गोगावले आणि स्नेहल यांच्या जय पराजयाची गणिते अवलंबून होती त्या निजामपूर गोरेगांव विभागातूनच आ. गोगावले यांना रोखण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली…
शिवसेनेचे म्हणजे अर्थातच आ. गोगावले यांचे बाले किल्ले समजल्या जाणाऱ्या महाड पोलादपूर तालुक्यातआ. गोगावले यांची घोडदौड रोखण्यात स्नेहल यशस्वी ठरली. महाड शहरात कॉर्नर सभा घेऊन आपल्या बाजुने वातावरण निर्मिती केल्यानंतरही स्नेहल जगताप यांना मताधिक्य मिळाले. परंतु सरते शेवटी आ. गोगावले यांचा तीन टर्म आमदारकीचा अनुभव, त्यांचे जमिनीवर असलेले पाय आणि केलेला विकास महाविकास आघाडीवर भारी पडला आणि स्नेहल जगताप या २६२१० मतांनी पराभूत झाल्या…मात्र नवख्या आणि पहिलीच निवडणुक आपले मार्गदर्शक भक्कम पाठिराखे स्व. माणिकराव यांच्या पश्चात लढवत असतानाही स्नेहल जगताप यांनी आपल्या वडीलांची ८० हजार मते तर राखलीच त्यात आणखी १५ हजाराची भर करून भविष्यातील लढतीची पायाभरणी केली…आपल्या कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी आपण जिंके पर्यत लढत राहायचे असा संदेश देत बळ दिले…आपला पराभव दिसू लागल्यानंतर मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना स्नेहल जगताप या आ. गोगावले यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यास विसरल्या नाहीत…मंत्रीपद घेऊन या आणि मतदारसंघातील जनतेची कामे करा अशा शुभेच्छा देत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाची परंपरा जपली… आपला पराभव खिलाडू वृत्तीने स्विकारुन विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांनी आपल्यातील प्रगल्भतेचे दर्शन संपूर्ण जनतेला घडवले…त्यामुळेच महाडच्या इतिहासात ज्या ज्या वेळी आ. भरतशेठ गोगावले यांच्या आमदारकीच्या चौकाराची चर्चा होईल त्या त्या वेळी स्नेहलच्या जिद्दीची तिच्या लढावू व खिलाडू वृत्तीचीही दखल नक्कीच घेतली जाईल…