महाडमध्ये चोरट्यांचे थैमान…नवे नगर भागातील सोसायटीमध्ये दोन घरे फोडली…

0
44

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

महाड शहरात मागील वर्षभरात अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आलेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. काल नवे नगर भागातील ग्रीन पार्क या गृहनिर्माण सोसायटीच्या ए व डी इमारतीमध्ये बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना उघड झाली आहे…या संदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित सोसायटीमार्फत तक्रार दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन युवक दिसून येत आहे.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ए विंग मधील अभिजीत झेंडे व डी विंग मधील मंगेश देशमुख यांचे बंद असलेले घर फोडल्याचे आज सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासाठी सदर यंत्रणा वरिष्ठ कार्यालयाकडे दिली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान या दोन बंद घरांपैकी एक घरातील मालक बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरात नक्की कोणत्या प्रकारचा ऐवज व रक्कम चोरट्यांनी लंपास केला याबाबतची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. महाड शहर पोलीस ठाण्यात या संदर्भातील पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले…मागील वर्षभरात महाड शहराच्या विविध भागांमध्ये या अज्ञातांकडून करण्यात आलेल्या घरपोडीच्या मोठ्या घटना पाहता महाड पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पुन्हा एकदा समोर उभे राहिले आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच महाड शहरानजीकच्या नातेखिंड परिसरामध्ये सहा बंद फ्लॅट फोडण्याची घटना ताजी असतानाच नवे नगर भागात बंद असलेले फ्लॅट फोडण्यात आल्याने महाडमध्ये फिरणाऱ्या या चोरट्यांसंदर्भात तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांसंदर्भात पोलिसांनी कसून तपास करावा व या चोरट्यांना गजाआड करावे अशी मागणी महाडकर नागरिकांकडून केली जात आहे.