रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनार्यांना प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवेआगार, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. परिणामी हॉटेल, लॉज,खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे.डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला की कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ सुरू होते. दिवाळीच्या सुट्ट्या, त्यानंतर डिसेंबरमधील विद्यार्थ्यांच्या युनिट टेस्ट संपल्यामुळे टेन्शन फ्री झालेले विद्यार्थी आणि वर्ष संपायला आल्याने सुट्टी संपवण्यासाठी तयार झालेले नोकरदार यामुळे पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांवर वळायला लागतात. दोन दिवसांपासून रायगडमधील किनारपट्टीवर पाहावे तिकडे पर्यटक दिसत आहेत. कुणी समुद्रात मनसोक्त डुंबत आहेत, कुणी एटीव्ही राईडबरोबरच वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा मनमुराद आनंद घेत आहेत. बच्चेकंपनी ऊंट सवारीची मजा घेत आहे, तर लहानमोठे सर्व वाळूत प्रतिकृती बनवण्यात रमलेले पाहायला मिळत आहेत.अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे अंदाजे 20 हजार पर्यटक दाखल झाले आहेत, तर मुरूड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरूड आणि फणसाड येथे 12 हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे. बोट व्यावसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत.इकडे मुरूडमध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत. राज्यभरातून पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले आहेत, मात्र बोटीत लहान मुलांना प्रवेश नसल्याने मुलाबाळांसह आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना जेट्टीवर येऊन किल्ल्याचे फोटो काढून उदास चेहर्याने परतावे लागत आहे.दरम्यान, बहुतांश पर्यटकांनी मुरुडमध्ये समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. काहींनी उंटावरून फेरफटका मारल्याची मौज घेतली तर काहींनी घोडा गाडीतून सैर केली. अनेक पर्यटकांनी बाईक फिरवण्याचाही आनंद घेतला.