खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली नगरपरिषद आणि वाद ठरलेले असल्याचे दिसून येत आहे. रोज नविन वादविवाद, नवनविन अपहार, नवनविन घडामोडी समोर येत आहेत. बांधकाम विभाग, नगर रचना विभाग यांच्यानंतर आता जन्म-मृत्यू विभागातील वाद समोर आले आहेत. जन्म-मृत्यू विभागातील लिपीक कैलास देशमुख यांनी आज पत्रकार व महिला अर्जदार यांच्यासोबत अरेरावी केल्याची घटना घडली. दरम्यान, नागरिकांवर उपकार करणाऱ्या लिपीक कैलास देशमुख यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हाळ खुर्द येथील एका महिलेने काही दिवसांपूर्वी जन्म दाखल्यात दुरूस्ती करण्यासाठी अर्ज केला होता. मुलीच्या शाळेच्या कामासाठी संबंधित दाखला आवश्यक असल्याने दररोज सदर महिला नगर परिषद कार्यालयात फेऱ्या मारत होती. आज तरी दाखला करून द्यावा अशी विनंती सदर महिलेने केली असता नागरी सुविधा केंद्रातील (CFC) लिपीक कैलास देशमुख यांनी महिलेला धुडकावून लावले. उपस्थित पत्रकार यांनी सदर प्रकार पाहिल्यानंतर देशमुख यांना जाब विचारला असता देशमुख यांनी पत्रकार व महिलांसोबत अरेरावी केली…कैलास देशमुख यांच्या अनेक सुरस कथा नगर परिषद व खोपोलीत ऐकावयास मिळतात. मृत व्यक्तींच्या दाखल्यात दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ऐवढेच नव्हे तर जन्म दाखल्यात पूर्ण नाव कोणतेही पुरावे नसताना केले असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा खोपोली नगर परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल. तसेच महिला व पत्रकारांसोबत अरेरावी करणाऱ्या लिपीक कैलास देशमुख यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा साप्ताहीक खालापूर वादळचे मुख्य संपादक खलील सुर्वे यांनी केली आहे.