शिंदेंच्या शिलेदारावर राष्ट्रवादीची मात… रायगडची किल्ली आली पुन्हा वाघिणीच्या हातात…

0
70

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

राज्याच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र आता अखेर ही यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता. राष्ट्रवादीच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती. भरतशेठ यांनी अनेकदा पालकमंत्रिपदावर दावा ठोकला होता. मात्र अखेर आदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत.राज्यात महायुतीचं 23 नोव्हेंबर रोजी सरकार आलं. राज्यातील जनेतेने महायुतीला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा 5 डिसेंबर रोजी नागपुरात शपथविधी पार पडला. मंत्र्यांनी पदभार स्वीकारला. मात्र कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायचं? हे निश्चित होत नव्हतं. अखेर हा तिढा सुटलाय. आता 18 जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालीय. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावर आता जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे…रायगडच्या रोहा तालुक्यात अदिती तटकरे यांची पालकमंत्री पदाची घोषणा होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला…तसेच फटाके वाजवत पेढे भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आला … राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते…