शिवसत्ता टाइम्स मुंबई (शेखर म्हात्रे ):-
शुक्रवार दि.०७-०२-२०२५ रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात एलजीबीटीक्यूआयए या समुहाच्या वतीने प्राईड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते… उपरोक्त समुदाय म्हणजे स्त्री-पुरुष यांच्या बरोबरीने तिसऱ्या लिंगात ज्यांची ओळख होते तो समाज म्हणजे “तृतीयपंथी-किन्नर-हिजडा” समुदाय… जोगती-दासी-गुरु-ट्रान्स महिला, ट्रान्स-पुरुष, गे, लेस्बियन, बायो-सेक्सुअल, समलिंगी असणाऱ्या व्यक्ती या समुदयात येतात… समान लिंग असणाऱ्या (पुरुष/ पुरुष, स्त्री/स्त्री) या समुदायावर मुंबई हायकोर्टाचे निर्देश असोत कि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असोत यावर सुनावणी अजून तरी सुरु आहे… सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे… आणि इतर देशातील (पाश्चिमात्य) न्यायालयांनी समलिंगी असणाऱ्या व्यक्ती या कायदेशीर विवाह करू शकतात, असे निर्णय दिले आहेत… भारतात तरी अजून समलिंगी कायदेशीर पद्धतीने विवाहास पात्र नसल्याचेच सांगितलेले आहे… या समुदायला आजवर अनेक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे…
स्वतःच्या हक्कासाठी कायदेशीर, न्यायालयीन लढाई लढावी लागते व स्वतःला सिद्ध करण्यासाठी अर्धे आयुष्य असेच घालवावे लागते… अनैसर्गिक, लैंगिक अत्याचार, घरातून-बाहेरून, शाळा, महाविद्यालये व अन्य प्रकारे होणाऱ्या अमानुष अत्याचार यातून किंवा जन्मताच स्वतःला वेगळे सिद्ध करू शकणारे, स्वतःला आपण इतरांपेक्षा निराळे आहोत, त्यामुळे वाढत्या वयानुसार शरीरात हार्मोन्समध्ये बदल होणे किंवा महिलांप्रमाणे मासिक पाळीचे बळी ठरणे अश्या एकनाअनेक कारणामुळे हा समुदाय तयार होतो… तर अनेक वर्षांपासून भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या हक्क, स्वातंत्र्य, मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात… संविधान आणि कायदे हे सगळ्यांना समान आहेत परंतु आपल्याला दुय्यम आणि अपमानस्पद वागणूक मिळत असल्यामुळे झगडावे लागते… तर आपण जसे आपल्या आई वडिलांनी जन्म दिला तसाच यांनासुद्धा त्यांच्या आई वडिलांनी जन्म दिलेला असतो…
परंतु अपमानास्पद, लज्जास्पद, अर्वाच्य भाषेत या समुदयाकडे पाहिले जाते… यांना प्रत्येक कार्यक्रमातून डावलण्यात येते…. जर आपल्या घरात शुभ कार्य असेल, तर यांना का बोलवण्यात येते…? आशिर्वाद का मागितला जातो, एक रुपया आणि अक्षता म्हणून तांदूळ का मागण्यात येतात, असे अनेक प्रश्न चर्चेत येतात… तर आपल्या सारखेच शिकलेली, कोणी उच्च शिक्षित आहेत… वकील, डॉक्टर, शिक्षक, वैमानीक, संशोधक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, अभिनेता, व्यवसायिक, रियल इस्टेट एजंट , बँक ऑफिसर्स, उद्योजक, राजकारणी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात या समुदायातील लोक कार्यरत असतात…
महाराष्ट्रातील पुण्यात अनेक ढोल ताशा ध्वज-पथके आपण पहातो… पुण्यात तर तृतीयपंथी बंधू-भगिनींचा ढोलताशा पथक आपल्या ऐकिवात असेलच… ‘श्रीखंडी ढोल ताशा पथक’ असे या तृतीयपंथीयांच्या ढोल-ताशा पथकाचे नाव असून, पुण्यात सर्वत्र मंगल कार्यात, गणेश व नवरात्री उत्सवात सज्ज असतात… मुंबईतील दर वर्षी होणाऱ्या प्राईड रॅलीत प्रथमच तृतीयपंथी बंधू भगिनींचे ढोल-ताशा पथक वादन करताना दिसून आले… मग समाजाची या तृतीयपंथीयांकडे बघण्याची विकृत दृष्टी नष्ट करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या मूलभूत हक्कासाठी, संरक्षणासाठी आणि याउपर या समाजाकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांना हीन लेखण्याची प्रवृत्तीचे निर्मूलन व्हावे यासाठी प्राईड रॅलीचे आयोजन करण्यात येते….