रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे…आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेची भाजप मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा बडा नेता प्रकाश देसाई यांनी आज पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला. यावेळी परळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख व सर्व सदस्य, घोटवडे सरपंच व सदस्य , नेनवली, राबगाव सह अन्य ग्रामपंचायतीमधील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जाहीर भाजप पक्ष प्रवेश केला. माजी सभापती उज्वला देसाई,माजी सभापती पिठू डुमना, माजी सभापती सौ. पुष्पा डुमना, माजी पंचायत समिती सभापती श्री संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई, व त्यांचे समर्थक तसेच विजय नगर मधील धर्मेंद्र आंदेकर तसेच साईनाथ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी ही भाजपात प्रवेश केला.
यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील,आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील,राजेश मपारा , गीता ताई पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचे पक्षात जंगी स्वागत करण्यात आले. याचवेळी खासदार व आमदार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी पालीतील लिमये सभागृह अफाट गर्दीने फुलून निघाले होते. यावेळी प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य व सक्षम नेता भाजपाच्या प्रवाहात आल्याने पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले.