सासवणे गावात काही तरुणांची दहशत… महिला व्यायामशाळेच्या इमारतीवर बेकायदा बांधकाम करण्याचा प्रयत्न…

0
18

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात काही तरुणांनी दहशत माजवली आहे. गावातील महिला व्यायामशाळेच्या इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी बेकायदा करण्यात येणारे बांधकाम गावातील महिलांनी बंद पडले. याचा राग धरून काही टवाळखोर तरुणांनी व्यायामशाळेत अश्लील भाषेत मजकूर लिहून त्या चिठ्ठ्या व्यायामशाळेत तसेच काही महिलांच्या घरात टाकल्या. यामुळे सासवणे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनासह, पोलिस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे अर्ज करीत न्याय मागितला आहे. या अर्जावर ३८४ नागरिकांच्या सह्या असून, शासनाने सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरविणे गरजेचे असल्याचची मागणी केली आहे. तसेच शनिवारी (दि.१५) ग्रामस्थानी मोठ्या संख्येने व्यायामशाळा परिसरात जमून, या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

सासवणे येथील संतश्रेष्ठ पेडणेकर महाराज मठ परिसरात शासकीय जागेत महिला व्यायामशाळा बांधण्यात आली आहे… या व्यायामशाळे लगत तलाव व झाडे होती. येथील जागेतील झाडे तोडून व तलाव बुंजवून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र याबाबीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे कोळीवाड्यातील‌ मुले क्रिकेट खेळायला येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी व्यायामशाळा इमारतीच्यावर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी रूम बांधण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. या बाबीला गावातील महिलांनी तसेच ग्रामस्थानी विरोध करीत काम बंद पाडले. यांनतर सदर तरुणांनी व्यायामशाळेवर बेकायदा सीसीटीव्ही कॅमेरा जोडला आहे.