मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
आयपीएल-२०२५ च्या मोसमातील तिसरा सामना चेन्नईत चेन्नई सुपर किंग्ज्स आणि मुंबई इंडियन्स बरोबर प्रकाश झोतात खेळला गेला पण प्रत्यक्षात प्रकाश झोतात आला तो म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचा पूर्वी कधीही प्रथम श्रेणी सामन्यात न खेळलेला विघ्नेश पुथूर हा गोलंदाज…
गेल्या सलग १३ वर्षांची परंपरा सांभाळत मुंबई इंडियन्सने पराभवाला गवसणी घातली तरीही संघाच्या गोटात आनंदाच्या लहरी उसळत होत्या, कारण विघ्नेश पुथूर याच्या रूपाने मुंबई इंडियन्सला एक हुकमी गोलंदाज गवसला होता. सामना गमावला खरा पण मोठ्या स्पर्धांचा कोणताही अनुभव गाठीशी नसतांना विघ्नेश पुथूर यांने सर्वांची मने आपल्या चमकदार उत्कृष्ट कामगिरीने जिंकली होती. सामन्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव यांनेही विघ्नेशचे कौतुक केले. एवढे नव्हे तर पॅव्हेलियनकडे परतताना महेंद्रसिंग धोनी यांनेही विघ्नेशचे कौतुक करत सर्वच खेळाडू परतत असताना विघ्नेशला लिडींगला पुढे करत सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून विघ्नेशचा गौरव करीत आपल्या खिलाडू वृत्तीचा प्रत्यय दिला.
आपल्या वाट्याला आलेल्या षटकात विघ्नेशने टिच्चून केलेल्या गोलंदाजीमुळे बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज्सला विजयासाठी चक्क २० वा षटका पर्यंत वाट पहावी लागली. या नवोदित २४ वर्षीय विघ्नेश पुथूरने ४ षटकात केवळ ३२ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेत पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपली छाप सोडली आहे. विघ्नेश पुथूर याच्या रूपाने आश्चर्यकारक नवीन खेळाडूंना नेहमीच संधी देणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या पारड्यात आणखी एका हीऱ्याची भर पडली आहे एवढं मात्र नक्कीचं…