मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
MMRDA च्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना विश्वासात न घेताच परळ येथील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि वर्षानुवर्षे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या उद्रेकाला पारावारच राहिला नाही.संतप्त नागरिकांनी “पूल बंद” चा MMRDA ने लावलेले फलक काढून भिरकावून देत MMRDA च्या विरोधात गगनभेदी घोषणा देत येथील उपस्थित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले. स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा, पुनर्वसनाचा, शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांचा, धंदे-व्यवसाय याबाबतीत विचार न करता केवळ उन्नत लोकांसाठी मुंबईच्या उन्नत विकासाचा डांगोरा पिटत सर्वसामान्यांना देशोधडीला लावून प्रसिद्धी घेऊ पाहणाऱ्या MMRDA, MCGB,आणि शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
चवताळलेल्या आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली व त्यांनी थेट स्पॉटवरूनच आपल्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी फोनाफोनी सुरू केलेली दिसली.खरं तर खऱ्या मुंबईकरांना कुठेतरी भिरकावून केवळ पांढरपेशींसाठी मुंबईच्या विकासाचा लेबल लावून येथील मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेच्या संसाराची धूळधाण करण्याची ही योजना म्हटली तर गैर काहीच नाही. येथील आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या कष्टकरी श्रमिक रहिवाशांना हाकलून धनिकांच्या गाड्या हाकलवण्यासाठीचा हा उद्धाम प्रयास आहे. येथील कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणीला सामोरे जाताना देखील जिकरीचे ठरणार आहे. शिवाय येथील विख्यात हॉस्पिटलांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या खेडूत गोरगरिबांचे काय ?येथील इस्पितळे त्यांना विधात्याची आश्रय स्थाने वाटतात…त्यांच्यासाठी लिलावती,कोकिळाबेन,अंबानी किंवा जसलोक ही भलीमोठी रुग्णालये नाहीत तर परळची केईएम,वाडीया,टाटा ही मायबापासारखी भासतात. शासनाच्या दरबारी बसलेले मग ते सत्ताधारी असोत अथवा विरोधी बाकावर बसणारे असोत, या साऱ्यांना निवडून पाठवणारी हीच सारी रयत असते, मग ती स्थानिक असो वा राज्यभरातून येणारी लोकं असोत…
हेच लोक मतदान देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनात पाठवतात आणि आता मात्र त्यांचा लढा त्यांनीच लढायचा आणि यांनी काय धनिकांचे पाय चेपत बसायचे ?महाराष्ट्र राज्याच्या सत्तास्थानी बसलेले मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी बाकावर बसणारे सारेच नेहमी आदराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करीत असतात, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेलली ही ओळ स्मरावी…निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू… श्रीमंत योगी”