माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
देशातील अत्यंत नामांकित आणि सामाजिक चळवळीत अग्रणी असलेल्या ‘पैगाम’ संस्थेचे एकदिवसीय रायगड जिल्हा अधिवेशन माणगाव येथे उत्साहात पार पडले. शनिवार, दि. 26 एप्रिल 2025 रोजी हॉटेल वक्रतुंड येथे भरलेल्या या सामाजिक परिवर्तन संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
या अधिवेशनात “मानवी मुल्ये प्रस्थापित केल्याशिवाय माणूस सन्मानपूर्वक जीवन जगू शकत नाही” या केंद्रस्थानी विषयावर विचारमंथन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ममता गोसावी (राज्य निमंत्रक, पैगाम) होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. बी.एन. वाघ (भूतपूर्व न्यायाधीश व राष्ट्रीय निमंत्रक) आणि प्रमुख अतिथी म्हणून मा. ऍड. स्वप्नाली लिंदाईत मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व निमंत्रकांच्या परिचयाने झाली. यानंतर प्रमुख स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अरिफभाई करबेळकर, लिंदाईत मॅडम, बी.एन. वाघ साहेब आणि ममता गोसावी यांनी आपले विचार मांडले.
या अधिवेशनात रायगड जिल्ह्यासह पनवेल आणि मुंबई येथून अनेक मान्यवर सहभागी झाले होते. त्यामध्ये मनोहर तांबे, दीपक सोनवळे, सरिता वाघ, ऍड. मोहन राठोड, भीमराज मोरे, कृषी अधिकारी अशोक मार्कंड, रवींद्र शेजोळे, सौं शेजोळे, चंद्रकांत मोरे, सुवर्णा ओव्हाळ, परिवर्तन वाघ, चंद्रकांत गायकवाड आणि जयश्री शिर्के यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे स्वागत, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भगवान गोसावी यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने पार पाडले. संपूर्ण अधिवेशनात सामाजिक परिवर्तनाबाबत सकारात्मक ऊर्जा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.या संमेलनामुळे रायगड जिल्ह्यात सामाजिक समतेच्या दिशेने नव्या विचारांची पेरणी झाली आहे,असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.