किहीमला अवकाळी पावसाचा जोरदार फटका… वादळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले…

0
13

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

अलिबाग तालुक्यातील किहीम येथे बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आलेल्या  अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील शेडचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा दिलासा दिला.

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, किहीम येथील काशिनाथ सदाशिव सुर्वे यांच्या घरावरील लोखंडी अँगल व त्यावर सिमेंट पत्रे अशी बांधलेली शेड होती. बुधवार दि. ७ मे रोजी दुपारी चार च्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने या शेडवरील लोखंडी अँगल व पत्रे उडून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. पत्रे उडल्याची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सुर्वे कुटुंबाला मोठा दिलासा दिला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अजून कोणाचे नुकसान झाले असल्यास किहीम ग्रामपंचायती कडे संपर्क साधावा, अशी विनंती केली आहे. या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे, तसेच पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याने याठिकाणी असणाऱ्या हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.