रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-
सर्वोच्च न्यायालयाने “चार महिन्यांत निवडणुका घ्या” असा दणका दिला, आणि रोहा नगरपरिषदेच्या गटारीतून बेडूक उड्या मारत बाहेर पडले! हो, निवडणुकीचा पाऊस पडताच गेली पाच वर्षे गायब असलेले नेते आणि प्रशासनाचे ढोंगी बेडूक “डराव डराव” करत रस्त्यावर आलेत. रस्ते, गटारे, कचरा साफ करण्याचा तमाशा सुरू झाला, पण रोह्याच्या जनतेला हे सर्कशीचे खेळ आता कंटाळवाणे वाटतायत…
रोहा नगरपरिषदेचा कारभार म्हणजे कचऱ्याचा डोंगर, गटारांचा सागर आणि भ्रष्टाचाराचा मळा! पाच वर्षे प्रशासनाने जनतेच्या तक्रारींना “काय ते कचरा?” असा टोमणा मारला. आता इलेक्शनच्या धडाक्याने रस्त्यांवर बुलडोझर धावतायत, गटारे चकचकीत होतायत, आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना अचानक पंख फुटलेत. पण हा सगळा जल्लोष म्हणजे मतदारांच्या डोळ्यांत धूळफेक, असं स्थानिक सागतायत. “आता साफसफाई, मग पुन्हा गटारात बुडी,” असा टोला संतोष राऊत नावाच्या रहिवाशाने लगावला.
आणि मग आपले नेते बेडूक! माजी नगरसेवक, जे पाच वर्षे चिखलात लपून बसले होते, ते आता गटारांजवळ सेल्फी काढत “लोकसेवा” चा टेंभा मिरवतायत. काही नवखे तरुण बेडूकही “आम्हीच रोह्याला स्वर्ग बनवू” असल्या गप्पा मारत उड्या मारतायत. सोशल मीडियावर फोटो, आश्वासनांचा पाऊस आणि स्वप्नांचा मारा सुरू आहे. पण जनता विचारतेय, “पाच वर्षे कुठे होता हा तमाशा?” निवडणुकीच्या या सर्कशीत नेते आणि प्रशासन एकमेकांवर कुरघोडी करतायत, पण जनतेच्या मनात एकच प्रश्न, “हे बेडूक पुन्हा गटारीत कधी जाणार?”
रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत कचरा, स्वच्छता आणि पारदर्शक कारभार हे मुद्दे गाजणार आहेत. पण मतदारांनी लक्षात ठेवा, हा “डराव डराव” फक्त इलेक्शनपर्यंतच! पुढच्या पाच वर्षांसाठी असा बेडूक निवडा, जो गटारीत लपणार नाही, तर खरंच काम करेल. “आता तरी सावध व्हा, नाहीतर पुन्हा गटार आणि कचऱ्याचंच राज्य,” असा खणखणीत सल्ला ज्येष्ठ नागरिक मंगेश जोशी यांनी दिला. रोह्याच्या या इलेक्शन सर्कशीत हसणार कोण आणि रडणार कोण, हे लवकरच कळेल!