भरधाव डंपरची एसटी बसला भीषण धडक… अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू;20 प्रवासी जखमी…

0
14

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

        तळा-मांदाड रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला आहे. रहाटाड येथून तळा येथे येणारी एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे, विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रथमदर्शनी पाहता, अपघातास डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून, तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, डंपर चालवणारा चालक वीस वर्षांखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.