माणगांव ठप्प! महामार्गावर जीवघेणी वाहतूक कोंडी, उपाययोजना कुठे आहेत?

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

माणगाव शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर मागील दहा दिवसांपासून निर्माण झालेली प्रचंड वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. माणगावहून मुंबई व महाडकडे जाणाऱ्या मार्गावर सहा ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या अखंड रांगा लागल्या असून, गती अत्यंत मंदावलेली आहे. काही वेळा वाहतूक पूर्णतः ठप्प होत असून, प्रवासी आणि स्थानिक नागरिक यांचं रोजचं जीवन विस्कळीत झालं आहे.

वाहतुकीचा अचानक वाढलेला ताण, दोन्ही दिशांनी वाहनांची गर्दी, आणि नियोजनाचा अभाव यामुळे माणगाव शहर जणू ठप्प झालं आहे. या कोंडीमुळे वेळेचं व्यवस्थापन धोक्यात आलं असून, नागरिक वैतागले आहेत.

रेल्वे स्टेशन परिसर, बामनोळी/निजामपूर क्रॉस रोड, एसटी स्टँड, मुख्य बाजारपेठ, कचेरी रस्ता कोपरा, आणि विशेषतः मोरबा रोड कोपरा—या ठिकाणी कोंडीचा प्रचंड त्रास होतो आहे. मुख्य चौकांवर फेरीवाल्यांची वाढती गर्दी, बेशिस्त पार्किंग, लग्नसराईची वाहतूक, पर्यटकांचा कोकणकडे वाढलेला ओघ, पादचाऱ्यांची वर्दळ आणि स्थानिक वाहनांची अनियमित हालचाल यामुळे वाहतुकीचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावरील नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. माणगावचे DYSP स्वतः गस्त घालत आहेत, माईकमधून सतत सूचना देत आहेत—”चुकीचं पार्किंग करू नका, वाहतूक नियम पाळा, ओव्हरटेक करू नका, लेन तोडू नका”—अशा विनंत्या केल्या जात आहेत. मात्र, समस्या इतकी भीषण आहे की हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. “रात्रंदिवस आम्ही वाहतूक कोंडीत अडकतोय. शाळकरी मुलं, वृद्ध, रुग्णवाहिका—सगळं अडकलंय. आणि प्रशासन अजूनही गप्प आहे,” असं संतप्त नागरिक सांगतात.

प्रशासनाकडून अद्याप कोणती ठोस कृती झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. माणगांवकरांची मागणी स्पष्ट आहे—महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग व राज्य शासनाने तातडीने लक्ष घालावं. रस्ते रुंदीकरण, वाहतुकीचं शास्त्रशुद्ध नियोजन, पार्किंगसाठी स्वतंत्र जागा, फेरीवाल्यांची योग्य व्यवस्था, आणि वाहतुकीचं तांत्रिक नियंत्रण यासाठी एकात्मिक उपाययोजना लागू करणं अत्यावश्यक आहे.प्रश्न एकच — माणगांव वाचवणार कोण? आणि केव्हा?