खारेपाट शिवसत्ता टाइम्स (महेंद्र म्हात्रे):-
पेण तालुक्यातील डोलवी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय मधुशेठ म्हात्रे यांचे दिनांक ६ मे २०२५ रोजी, वयाच्या ६८व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. मधुशेठ हे स्व. बालाजीशेठ म्हात्रे (माजी सभापती, पेण) यांचे पुतणे, तसेच डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे व पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे यांचे वडील होते. ते जिल्हा परिषद रायगडचे माजी शिक्षण सभापती सुरेश म्हात्रे यांचे काका होते.त्यांच्या अंत्यविधीसाठी आमदार रवीशेठ पाटील व त्यांचा परिवार, जि.प. माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, माजी पं.स. सभापती (अलिबाग) बाळूशेठ पाटील, तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व नेतेमंडळी, JSW कंपनीचे अधिकारी राजेश कुमार रॉय, प्यारो आत्माराम बेतकेकर, कुमार थत्ते, पेण नायब तहसीलदार नितीन परदेशी, ज्येष्ठ उद्योजक राजू पिचिका, तसेच अलिबाग, पेण, वडखळ परिसरातील नागरिक, आप्तस्वकीय व समस्त म्हात्रे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून मधुशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
समाजसेवेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यांनी युवकांसाठी व्यायामशाळा उभारून आरोग्यदृष्ट्या भरीव कार्य केले. धार्मिक कार्यामध्ये विशेष रुची असलेले मधुशेठ हे श्री विठ्ठल-ज्ञानेश्वर महाराज परंपरेचे भक्त होते. पंढरपूर, शिर्डी व माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंड्यांचे स्वागत, भाविकांसाठी अल्पोपहार व आर्थिक मदतीचे आयोजन, तसेच JSW कंपनीत स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, हे त्यांचे कार्य विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.
पाबळ खोऱ्यातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना ते सदैव मदत करत असत. वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्या घराण्यातील तिसऱ्या व चौथ्या पिढीतही आजही जपली जात आहे. परिसरातील जनतेला न्याय मिळावा यासाठी ते नेहमी तत्पर असत.स्व. मधुशेठ यांचा मूळ व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय असून, या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर १२ दिवस भागवत कथा व शिवचरित्र वाचन आयोजिले जाणार असून, उत्तरकार्याच्या दिवशी ह.भ.प. गोपाळ महाराज चिंधणकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.शोक संतप्त कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी परिसरातील अनेक नागरिक, आप्तेष्ट, व मान्यवर निवासस्थानी भेट देत आहेत…